Description
'निरनिराळया धर्मांच्या अनुयायांत जे संघर्ष होतात त्यांवर पूर्णपणे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार व धर्मनिरपेक्षतेची सक्त अंमलबजावणी हे एकमात्र उत्तर आहे. हिंदूंचे प्रश्न हे त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांवर होणा-या आक्रमणांविषयीचे आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला ते धसाला लावता येतात; असे करताना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोचत नाही किंवा ते जातीय (कम्यूनल) ठरत नाहीत. मात्र हिंदू समाजावर अन्याय होतात याचे कारण तो असंघटित आणि दुर्बल आहे. त्यामुळे हिंदुसंघटनाला पर्याय नाही. पण हे संघटनही धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या चौकटीत राहून नागरी समाजातील (सिव्हिल सोसायटीतील) स्वयंस्फूर्त संस्थांना करता येते. यासाठी धर्मनिरपेक्षतेचा आशय नीट समजून घेतला पाहिजे, तिची अपरिहार्यता ओळखली पाहिजे आणि तिच्यावरची श्रध्दा दृढ केली पाहिजे. या पुस्तकात केलेली हिंदुत्वविचाराची फेरमांडणी या स्वरूपाची आहे.