Description
प्रा. शेषराव मोरे हे 1980 नंतर महाराष्ट्रात उदय पावलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक होत. त्यांची मते कुणाला पटोत वा न पटोत, पण कुठल्याही प्रश्नावर लिहिताना त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे, परिश्रमपूर्वक संदर्भ गोळा करणे, त्या विचारांची संगती लावणे व त्यानंतर लेखनाला सुरवात करणे अशी एक शिस्त त्यांच्या लेखनाला आहे. त्यांची मते पटली नाहीत, तरी ती केवळ प्रतिक्रिया व्यक्त करून वा शेरेबाजी करून खोडून काढता येत नाहीत... ''चिकित्सक लेखनाला जे मोकळे वातावरण हवे, ते हळूहळू संपत चालले आहे आणि चिकित्सेच्या नावाखाली काही राजकीय पक्षाची सोय होईल अशा भाडोत्री विचारवंतांचे लेखन सध्या प्रतिष्ठा पावू लागले आहे... फुले-आंबेडकरवाद बदनाम करावा किंवा विपर्यस्त स्वरूपात तो मांडावा ह्याचे पध्दतशीर प्रयत्न चालू आहेत. शौरी यांचे लेखन या स्वरूपाचे आहे... अशा अवस्थेत शौरीसारख्यांच्या हाती आणखी काही चुकीचे पुरावे आंबेडकर अनुयायांच्या उदासीन वृत्तीमुळे जाऊ नयेत याची काळजी बाबासाहेबांच्या अनुयायांनी घेणे भाग आहे, असे प्रा. मोरे यांना अतिशय तीव्रतेने वाटले... केवळ एक सावरकरवादी विचारवंताचे हे लेखन आहे या एकाच कारणासाठी या गंभीर मुद्दयाकडे दुर्लक्ष होऊ नये... ''डॉ. आंबेडकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथसंपदेचा एकत्रित स्वरूपात विश्लेषक असा परिचय या पुस्तकात आहे. पण हा ग्रंथ म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण विचारांची चिकित्सा नव्हे किंवा ग्रंथांची समीक्षा नव्हे!... महापुरुषाच्या लेखन-उक्तीत अनेक प्रसंगी अंतर्विरोधही दिसून येतो, हा अंतर्विरोध दाखवून देत आंबेडकरी विचारांची संगती वाचकांसमोर ठेवणे हा या ग्रंथाचा हेतू आहे... डॉ. आंबेडकरांच्या लेखनात व्यक्त झालेले बदल वा अंतर्विरोध हे त्यांच्या कार्यक्रमाधिष्ठित प्रवासाशी कसे सुसंगत आहेत, त्याचाही अन्वय या ग्रंथात आहे... अतिशय निकोप मनाने या ग्रंथाचे स्वागत करायला हवे... योग्य दिशेनेच दखल घेतली जावी.'' - दत्ता भगत