Description
जावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. ‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय चित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्याचा सार्थ अभिमान बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.