Description
प्रिय दिलीप 'जिगसॉ', 'जिव्हाळा', माझं संकल्पित पुस्तक 'जिज्ञासा' या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा समान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोर प्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंध येत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात न घेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधील संवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचा वेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेली पंचेचाळीस वर्षं तुम्ही 'माणूस'मधून आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या लेखनाचा पाठपुरावा करत आलात. मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशी संपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासून विश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंत युगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते. वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा. ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन. -रामदास