Description
'कृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पना वैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीची आणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे. त्या संकल्पनेशी संबंधित गणिती सूत्रे म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर दुर्लघ्य पर्वतच. पण असे क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून देण्याची हातोटी ज्या मोजक्या मान्यवर मराठी लेखकांना साधली आहे, त्यांच्यात प्रा. मोहन आपटे यांचा आवर्जून समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे कृष्णविवराबद्दलची श्वेतपत्रिकाच आहे, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही. कृष्णविवर म्हणजे काय, या प्रश्नापासून कृष्णविवराच्या निर्मिती-स्थिती-लय या त्रिविध अवस्था असतात का, या प्रश्नांपर्यंत अनेक प्रश्नोपप्रश्नांची सविस्तर, साधार उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. सृष्टीच्या निर्मितीचे गूढगुंजनात्मक कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात असणा-या असंख्य खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचे निष्कर्ष-दुवे एकमेकांशी जोडून कृष्णविवराचा रहस्यभेद करणारी ही सुसंगत कथा प्रा. आपटे यांनी जिज्ञासू वाचकांना सांगितली आहे. गणिती सूत्रे ज्यांना क्लिष्ट वाटतात त्या वाचकांना गणितावर आधारित खगोलशास्त्रीय संकल्पना निव्वळ विवेचनातून समजावून देण्याचे अवघड काम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले आहेच, पण तशा सूत्रांची भीती न बाळगणा-या जिज्ञासूंसाठी कृष्णविवरच्या संकल्पनेशी निगडित असणारी काही सोपी गणिती सूत्रेही त्यांनी मुद्दाम पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दाद द्यावी, असे हे पुस्तक.'