Description
रामायण-महाभारतासारख्या प्राचीन महाकाव्यांचा जो विविध दृष्टीकोनातून चिकित्सक अभ्यास होत आहे, त्यामुळे त्याकाळचे समाजजीवन, राजकीय स्थित्यंतरे, व्यक्ती-त्यांचे स्वभाव, गुणदोष, स्त्री-पुरूष संबंध इत्यादी गोष्टींबाबत नवी नवी माहिती उजेडात येत आहे. शाप आणि वर हे महाभारत ग्रंथाचे केवळ शोभनीय पैलू नसून ते अंगभूत असे अविभाज्य भाग आहेत. रामायण घडले ते दशरथाने कैकयीला दिलेल्या वरांमुळे आणि महाभारत साकारले ते देवव्रताच्या प्रतिज्ञेतून. रामायणात ६१ शाप आणि ८४ वर आहेत तर महाभारतातील शापांची संख्या १४७ असून वर २७२ आहेत. शपथा, प्रतिज्ञा, सत्यक्रिया, आशीर्वाद, आकाशवाणी यांचे प्रमाणही उपेक्षणीय नाही. ग्रंथरचनेतील या सर्वांचे स्थान आणि योजना महत्त्वपूर्ण आहे. व्यास-वाल्मिकीसारख्यांना शाप / वराची योजना करण्याची आवश्यकता का भासली असावी ? ही संकल्पना कशी उदयास आली ?शाप / वर देण्याचा अधिकार कोणाला, केव्हा आणि कसा प्राप्त होऊ शकतो ? अतिरिक्त उपयोगाने शाप / वर निष्फळ होतात काय ? कोणत्या वैशिष्टयांमुळे त्यांचा एवढया विपुल प्रमाणात उपयोग करण्यात आला ? साहित्यदृष्टया शाप / वर यांचे मूल्य काय ? हे या ग्रंथाचे अलंकार, विभ्रम की अविभाज्य अंग ? त्यांच्याविषयी समाजाला इतके जबरदस्त आकर्षण का वाटावे ? इत्यादी अनेक प्रश्न हे ग्रंथ वाचताना मनात येतील. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे.