Description
आपल्या उपसंहारात शेजवलकर लिहितात— ‘मग मराठे पानिपतावर कशासाठी लढले म्हणायचे? अशासाठी की, दिल्लीची पातशाही राखण्याचे जे कार्य त्यांनी करार करून अंगावर घेतले होते, ते पार पाडण्यासाठी आणि अब्दालीसुध्दा एका उच्च व त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठीच लढला. हे कर्तव्य हिंदुस्थानातील इस्लामचे रक्षण हेच होय.’ आणि पुढे लिहितात, ‘ मराठ्यांनी अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून दिले होते. मराठ्यांनी मुसलमानी राज्ययंत्र इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हाकून द्यावे व स्वत:चे राज्य स्थापावे. या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतांतील लोकांत हे लोण पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखुरी शोकांतिका होय, पानिपताचा पराभव नव्हे!’