Description
‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल- पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’ सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी पहिला पेशवा ‘बाळाजी विश्वनाथ’ वगळला, तर इतर सहा पेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे पेशवे ‘पुण्याचे पेशवे ’म्हणून इतिहासात ओळखले जाऊ लागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार ऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून केला आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.