Description
... गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' यामागचं रहस्य कशात आहे? ते आहे बाईंच्या जीवनोत्साहात. त्यांच्या वृत्तींमध्ये नित्य ताजेपणा आहे. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. म्हणूनच त्यांना म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचं भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं...