Description
'हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं. पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जाताना पिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेली वाट मागे पडली खरी. घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती, तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती. खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं. भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीत फेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली. आपली मुळं शोधावीशी वाटली. नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात - पण करू नये ते केलं. हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेली माझी आई गवसली, आजी सापडली. भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले... मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडे प्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं. त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले. नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की, निखळ ‘मी’ अशी नाहीच. अनेक माणसांनी- त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशा अनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे. गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे. या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे.'