Description
“धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले हे शाहू छत्रपतींचे चरित्र आहे. व्यक्ती वादग्रस्त आणि ज्या समाजात ती वावरली तो समाजही वादळी. या दोघांचे वस्तुनिष्ठ आणि अभिनिवेशरहित चित्रण करणे अवघड. पण किरांकडे चरित्र लेखनाची किमया आहे. ‘नामूलं लिख्यते’ ही धारणा आहे आणि चरित्रविषयांप्रमाणे रूप घेणारी लेखनकला आहे. त्यामुळे हे चरित्र वाचनीय झाले आहे. समाजक्रांतीचा प्रेषित असणारा मनुष्यच महान ठरतो, हे कीरांच्या चरित्रलेखनाचे सूत्र आहे. सावरकर, आंबेडकर, फुले यांच्या चरित्र-परंपरेतील, शाहू छत्रपती हे एक पुढचे पाऊल आहे.
आधीच ते छत्रपती शाहूमहाराजांचे लोकोत्तर चरित्र आणि त्यात कीरांची लोकविलक्षण प्रतिभा. इतिहासकाराइतकीच चरित्रलेखकावरची जबाबदारी अवघड. सत्य, सत्य आणि केवळ सत्यच निर्भयपणे प्रकाशात आणावयाचे. सत्य प्रकट करताना कुणाच्याही दबावाखाली व दडपणाखाली न राहता, चरित्र-नायकाला संपूर्ण न्याय द्यायचा ही बिकट कामगिरी कीरांनी मोठ्या कसोशीने पार पाडली आहे.