Description
तसं तर काल उत्कटपणे 'जगलेलं' सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं - - नवे अर्थ हाती घेऊन! लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी! स्वतंत्र! माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपण सुध्दा आयुष्यातल्या वेगवेगळया टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली 'उमजण्या'ची ताकद मोठी तितकं आपलं 'भंगणं' अधिक! 'उमजून' घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकाकीपणाची तीव्र संवेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच!