Description
तुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष साधावयाचा असेल तर मजप्रमाणे भुई धरून रहाणे शिकावे लागेल. राजकारणात भुई धरून रहाण्यास पर्याय नाही. राजकारण अनेक करतात परंतू कितीही विलंब लागला तरी जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता संधीची वाट पहातो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व राजकारणी होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण संपतो. संधी पुन्हा येते तेव्हा आपण नसतो. तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस व भलतेच काही तरी करीत आहेस, तसे करू नको. तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवितो परंतू असे काही घडविल्याच्या आरोपातून नामानिराळा रहातो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.