Description
बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ,
साग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे ‘बांधावरची
झाडे' हे पुस्तक.डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित
बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल,
भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ
वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध
ज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास
व परिसर विज्ञानाविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान
आहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा
महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या मानवनिर्मित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या
कल्पनानिरीक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे
यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे.
लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत.
लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी
संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. डॉ. शिंदे यांच्या या
झाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे
बांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल