Description
एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्त्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे अत्यंत रंजकपणे मांडला आहे - त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके !
गणितासारख्या गहन विषयाबद्दल सोप्या भाषेत आणि तेही मर्यादित काळात लिहिण्याला साहजिकच काही मर्यादा येतात आणि मांडणीमध्ये त्रुटीही संभवतात. प्रस्तुत पुस्तकात अशा अडचणींवर बव्हंशी मात केली आहे. वाचकानं पुस्तकातली सर्व विधानं प्रमाणभूत न मानता कुतूहल चाळवेल तिथं अधिक खोलात जाऊन विषय जाणून घ्यावा. असं घडलं तर माझ्या दृष्टीनं अच्युत आणि माधवी यांच्या कर्तबगारीचं आणि अथक श्रमाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.
डॉ. श्रीकृष्ण दाणी, सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ, डिस्टिंग्विश्ड व्हिजिटिंग प्रोफेसर, आयआयटी, बॉम्बे
मराठीतलं गणिताच्या प्रगतीचा आढावा घेणारं एक विस्तीर्ण, पण सोपं आणि रंजक असं 'गणिती हे एकमेव पुस्तक असावं. या पुस्तकाचा मराठी लोकांवर चांगलाच प्रभाव पडेल असं मला वाटतं. गणितासारख्या रुक्ष आणि क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयाला किती रोचक इतिहास आहे, तसंच गणिताचा विकास आणि संशोधन किती विविध अंगानं बहरलेलं आहे आणि अजूनही त्यात किती आव्हान आहेत याची प्रचीती सामान्य लोकांना हे पुस्तक वाचून नक्कीच येईल, याची मला खात्री वाटते. - डॉ. सुधीर घोरपडे, सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ, गणित विभाग प्रमुख, आयआयटी, बॉम्बे
'गणिती' हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असताना, ते गणित निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या मोठमोठ्या गणितज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला अर्थपूर्ण असा चांगला परिचय होत जातो. यातूनच गणिताच्या अतिरथी-महारथींमध्ये गणिताचा बादशहा कोण, गणिताचा शापित यक्ष कोण, निर्धन असूनही गणिताची श्रीमंती अंगाखांद्यांवर मिरवणारा गणिती कोण, जगाला कोडी घालणारा गणिती कोण, गणिताचा शिल्पकार हे बिरुद समर्थपणे पेलणारा गणिती कोण, प्रज्ञावंत असूनही विनम्र राहणारा गणिती कोण, गणितींमधलं अतिसुप्रसिद्ध घराणं कोणतं, गणिताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी ज्यांची नावं लिहिता येतील असे गणिती कोणते या संबंधातलं ज्ञान वाचकाला होत राहतं व तो अतीव गोडीनं पुढेपुढे वाचतच राहतो. त्याचप्रमाणे गणिताच्या या इतिहासाबरोबर गणितातील काही महत्त्वाच्या प्रमुख विषयांचं आजकालच्या दिवसांत सर्वसाधारण व्यक्तीला जेवढं ज्ञान आवश्यक आहे, तेवढं ज्ञानही हे पुस्तक समर्थपणे देत राहतं. अशा त-हेनं गणिताच्या इतिहासाविषयीची आस्था व कुतूहल वाढवत गणिताच्या आवश्यक तेवढ्या प्राथमिक ज्ञानाचा काही भाग सुलभपणे देणारं हे पुस्तक सर्वांना
आवडलं, तर त्यात नवल ते काय !