Description
सतराव्या शतकात महाराष्ट्रात जी अनेक नर-रत्ने आपल्या मर्दुमकीने, साहसाने व बुद्धिचातुर्याने प्रसिद्धीस आलेली होती, त्यांची चरित्रे प्रसिद्ध झाली असता आपणास तद्वत आपल्या भावी पिढीस त्यांच्या गुणांचा व कृत्यांचा आदर उत्पन्न झाल्यावाचून राहणार नाही. या हेतूने मावळा सरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचे चरित्र आम्ही लिहिले आहे.या चरित्रात चरित्रनायकांच्या घराण्याची प्राचीन माहिती जितकी उपलब्ध झाली, तितकी दिली आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या पूर्वजांनी बहामनी राज्यात व तदनंतर निजामशाही, अदिलशाही वगैरे राज्यांत स्वपराक्रमाने अनेक वतने संपादन केली. त्याची हकिकत शक्य ती दिली आहे. मुघलांनी महाराष्ट्र आपल्या ताब्यात आणण्याकरिता जे अनेक अघटित प्रयत्न केले, त्या वेळी महाराष्ट्रात सर्वत्र यवनशाही होऊन हिंदूंचे नाव तरी राहते किंवा नाही, अशी परिस्थिती होऊन गेली होती. अशा भयंकर परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचे व स्वधर्माचे संरक्षण करण्याकरिता राजकारण चालू केले! त्या वेळी चरित्रनायक विजापूरकरांचे अंकित असतानाही आपल्या स्वार्थाची किंवा अदिलशाहाकडून होणाऱ्या शासनाची यत्किंचितिही पर्वा न करता केवळ स्वधर्मसंरक्षणार्थ ते शिवाजी महाराजांच्या राजकारणात स्वयंस्फूर्तीने येऊन मिळाले. तेव्हापासून आमरण महाराष्ट्रास यवनांच्या जाचातून मुक्त करण्याकरता त्यांनी स्वराज्याची एकनिष्ठ सेवा केली. या थोर पुरुषाच्या चरित्राची महाराष्ट्रवासीयांना सांगोपांग माहिती मिळावी, या हेतूने हे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांच्या घराण्याची अर्वाचीन माहिती उपलब्ध झाली ती व महत्त्वापुरती वंशावळ शेवटी दिली आहे.