Description
‘राजहंस’ने आयोजित केलेल्या, ‘कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञानकादंबरी’ लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी ही कादंबरी केवळ कुमार वाचकांनाच नाही, तर प्रौढ वाचकांनाही रंजक वाटेल अशी आहे. कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, ही कल्पनाच मुळी अफलातून आहे. विज्ञान कादंबरी असली, तरी लेखकाने तिच्यात तांत्रिक माहितीचा भडिमार केलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याबद्दलची माहिती कादंबरीत अधूनमधून येते, पण ती जरूर तेवढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचे कुतूहल जागृत व्हावे पण त्याला अडखळायला होऊ नये, अशा बेताने. कादंबरीतील व्यक्तिरेखा ठसठशीत उतरल्या आहेत. संवाद सहजसुंदर आहेत. विज्ञान अचूक आहे आणि रहस्य वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले, की संपूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवता येत नाही. - सुबोध जावडेकर