Description
‘‘हा एक अगदी वेगळ्या वाटेनं जाणारा चित्रसंग्रह. तो पाहायचा आणि वाचायचाही. वाचायच्या आहेत त्या कविता. चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात. प्रत्येक चित्र सरळ पाहायचं. नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं. असा अफलातून संग्रह प्रथमच माझ्या पाहण्यात आला...’’ ‘‘...पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास, गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील. पाहणा-याच्या दृष्टीवर ते सोपवावं. प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं. एक कोडं घालतं. मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं. असा हा दृश्यकलेचा खेळ. वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा. चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन:पूर्वक अभिनंदन!’’ - शि. द. फडणीस, पुणे