Description
सट्टक हा कवी भालचंद्र नेमाडे यांचा काव्यसंग्रह, देखणी (मेलडी आणि देखणी एकत्रित – 1991 (प. आ.)) नंतर तब्बल पस्तिसेक वर्षांच्या अंतराने प्रकाशित होत आहे. कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा संग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी, दुय्यम पातळीवर ढकललेला शोषित जीव हे घटक या कवितेच्या केंद्रभागी आहेत. वास्तविक सट्टक म्हणजे आजच्या मूल्यèहास झालेल्या जगण्यावर ओढलेला प्रखर आसूड आहे. सट्टक मधील कविता चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाई, बहिणाबाई, महात्मा फुले, मर्ढेकर यांच्या गद्य व पद्य परंपरेशी थेट नाते सांगते.
सट्टक मधील ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कवी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडवा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक.
‘घराघरातून’ या पहिल्या कवितेपासून ते ‘स्व’ ह्या अखेरच्या दीर्घ कवितेपर्यंत अस्वस्थ व सळसळते, करुणेने भरलेले कविहृदय प्रत्ययास येते. कवी भालचंद्र नेमाडे यांच्या प्रतिभाशक्तीचा संचार तळागाळापासून ते प्रस्थापित, उच्चभ्रू व्यवस्थेला, कधी पित्तृसत्ताक तर कधी मातृसत्तात्मकतेला कसा भेदत जातो याची येणारी प्रचीती सट्टक मध्ये अधिक तीव्र स्वरूपाची आहे. सत्तात्मक संबंधांतून आकारलेल्या शोषितांच्या वेदनांची कैफियत हा सट्टकचा केंद्रबिंदू असून कवीच्या संचित मनशक्तीतून, अनुभूतींतून, वास्तवाच्या प्रामाण्यातून ह्या कवितांचा आकृतिबंध साकारलेला दिसतो.
‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ हे तिन्ही विभाग चढत्या क्रमाने वाचकाच्या मेंदूचा कब्जा घेतात. एकूण सट्टक कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा ‘सरवा’ वेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती ‘अस्तुरीमृग’ मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे वाचकाला सुन्न करून सोडतात. ‘अस्तुरीमृग’मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर ‘मृत्यू’ या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते.
सट्टकचा आशय जसा अनवट आहे तसाच आकृतिबंधसुद्धा कोणत्याही परंपरेत बसवता न येणारा स्व-तंत्र आहे. लोकसंगीताची लय अंगात भिनवून ही कविता मौखिक परंपरेला स्वतःशी जोडून घेत संत परंपरेला आपलेसे करून स्वतःचे नवे प्रारूप घडवते. सट्टक हा काव्यसंग्रह मराठी कवितेला नवा आयाम प्राप्त करून देतो हे विशेषत्वाने नोंदवले पाहिजे.