Description
बाई. या दोन अक्षरांनी मराठी रंगभूमीचं अर्धशतक स्वत:त सामावून घेतलं आहे. ह्या पन्नास वर्षांत अनेक नाटककार, कलावंत नि तंत्रज्ञ बाईंच्या जगाशी एकरूप झाले. ती दुनिया या पुस्तकात लखलखते आहे. रंगभूमी हा माणसांनी, माणसांसाठी नि माणसांव्दारा रचलेला अद्भुत खेळ आहे, हे विजयाबाईंना पक्कं ठाऊक आहे. मराठी रसिकांना त्यांच्या अविस्मरणीय नाटयकृतींची जबरदस्त मोहिनी पडली हे तर खरंच; परंतु विजयाबाईंनी मराठी रंगभूमीला ग्लोबल थिएटरशी विचारविनिमय करण्याचं बळ दिलं, प्रतिष्ठा दिली; हे निश्चितच त्यांचं मोठेपण. विजयाबाईंच्या कलाकिर्दीला रेनसाँची भव्यता लाभली आहे. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आणि समृद्ध जाणिवांचा तटस्थ आणि सहृदय विचार, ही या पुस्तकाची प्रधान प्रेरणा आहे. विजयाबाईंनी अनेकांना मोठं केलं; अनेक लेखक-कलावंत घडवले. त्यांच्या शिष्यांची, सहकाऱ्यांची हृद्य मनोगतं हे या पुस्तकाचं लोभस वैशिष्टय. पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, भक्ती बर्वे, डॉ. श्रीराम लागू, मोहन तोंडवळकर अशांच्या अल्पाक्षरी, रसरशीत शैलीत बाईंनी लिहिलेल्या शब्दचित्रांमुळे पुस्तकाचं मोल वाढलं आहे. बाई वाचकांना दीर्घकाळ आनंद देईल, हे निर्विवाद! झिम्मा हे बाईंचं आत्मचरित्र. बाई हे एका रंगपर्वाचं चरित्र.