Description
'मराठीत स्त्रियांच्या आत्मवृत्तांना एक समृध्द परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा उंचावणारे ‘कुणास्तव कुणीतरी...’ हे यशोदा पाडगावकर यांचे अविस्मरणीय आत्मवृत्त. सासवडमध्ये यशोदाबाईंचे वडील ख्रिस्ती धर्माचे मिशनरी होते. तिथल्या बालपणाच्या सुखाच्या काळापासून हे आत्मवृत्त सुरू होते. एकाएकी हे सुखाचे दिवस संपतात. वडिलांचा अकस्मात मृत्यू होतो. कुटुंबाच्या प्रपंचाचे तारू हेलकावे खाऊ लागते...नियतीच्या चढउतारातले अनुभव यशोदाबाईंचे संवेदनक्षम मन नोंदत राहते: नोकरी आणि मुलांचे संगोपन या उसाभरीत आईची होणारी त्रेधा, भावंडांचे व स्वत:चे शाळा-कॉलेजांतले शिक्षण, मित्रमैत्रिणी, शिक्षक, वाढणारे वय, त-हात-हांच्या दुष्ट-सुष्ट व्यक्ती त्यांच्या अभिलाषा आणि सदिच्छा... प्रतिभावंत कवी म्हणून पुढे ख्यातनाम झालेल्या मंगेश पाडगावकरांवर जडलेली प्रीती. लग्नासाठी घरी झालेला तीव्र विरोध आणि तो निर्धाराने दूर ठेवून लग्नात झालेली परिणती...एका धर्माच्या संस्कृतीतून दुस-या धर्माच्या संस्कृतीत प्रवेश करत असताना आयुष्यभर करत राहावा लागलेला मानसिक संघर्ष...मिळालेला सन्मान आणि साहिलेल्या अवहेलना... अर्धशतकातूनही अधिक काळ अनुभवलेल्या विशाल जीवनकलहाचे रम्यभीषण रूप यशोदाबाई इथे संवेदनशीलतेने, सहजपणे चित्रित करतात. त्यांच्या जीवनविषयीच्या अनावर उत्सुकतेची, रसिक आणि आनंदी वृत्तीची, स्वभावातल्या ऋजुतेची आणि सोशिकतेची साक्ष सतत मिळत राहते. संसारातल्या सुखदु:खांच्या छायांच्या पलीकडे जाऊन त्या त्यांचे स्वरूप अलिप्तपणे पाहताना दिसतात....जीवनाचे निखळ रूपच त्यांना पाहायचे आहे हे जाणवते. हे रूप पाहत असताना, हरपत चाललेल्या श्रेयाचा झाकोळ त्यांच्या लेखनावर उतरत येतो. ‘मी कशी जगत आले याविषयी मोकळेपणानं, अलिप्तपणानं लिहावं एवढीच या लिहिण्यामागची ऊर्मी होती, असे यशोदाबाईंनी मनोगतात म्हटले आहे. त्याचा निर्भर प्रत्यय इथे येतो.’