Description
`युगानुयुगे निद्रिस्त राहिलेल्या चिनी माणसाला सतत जागं ठेवण्यासाठी वारंवार क्रांतीचं धक्कातंत्र अनुसरावं लागतं...' माओच्या या वचनाचा आधार घेऊन त्याच्या चिआंग चिंग या पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये `सांस्कृतिक क्रांती' नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली. त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवन पार उद्ध्वस्त झालं. अशाच एका अभागी, पण जिद्दीनं परिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथन म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या चिनी समाजाचं एक विदारक चित्र आहे. हे आत्मकथन कोणत्याही सहृदय माणसाला मनाला घायाळ करील, इतकं प्रत्ययकारी आहे. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्या जगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची ही कथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच ती तिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे. तिचं सर्वस्व हिरावून घेण्यासाठी टपून बसलेले विध्वंसक रेडगार्ड्स, त्यांना प्रोत्साहन देणारे मतलबी नेते आणि त्या नेत्यांच्या दडपशाहीला बळी पडून सग्यासोय-यांच्याच जिवावर उठणारे दीनवाणे सामान्यजन या सा-यांचे अत्यंत प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटलेले आढळते. सर्वसामान्य चिनी माणसाच्या व्यथावेदनांचा परिचय करून देणारे... ऊरबडवा आक्रोश न करतासुद्धा मरणप्राय यातनांना शब्दरूप देणारं... आणि लेखिकेच्या अनुभवांचा अस्सल प्रत्यय देणारं आगळं आत्मकथन म्हणून निएन चंगचं हे पुस्तक जगभर गाजलं आहे, ते या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळेच!