Description
मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे