Description
'मूर्ख कुठली ! आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली. तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले तुकडे खावेत - आजी सांगत होती. तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही - आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती. पण आज गारठा जास्त आहे - बानोताई माझी कड घेत होती. गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय लावून मुलीला बिघडवू नकोस - आजीनं बानोला तंबी दिली. त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची नावडती आहे. लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा लेखिकेची कादंबरी आता मराठीत. दुस्वासच्या निमित्तानं नागालँडचं साहित्य प्रथमच मराठीत येत आहे. '