Description
तें – तुम्ही आम्हाला पटलात, आवडलात,स्पर्शून गेलात, ते वास्तवाला थेट भिडण्याच्या वृत्तीमुळे. या वृत्तीमागे होती एक अदम्य जिज्ञासा... जगण्याबद्दलचे नितांत कुतूहल. या कुतूहलापोटी तुम्ही माणसांना बोलते करायचात आणि ऐकायचात तेव्हा वाटायचे, तुम्ही समोरच्याचा अनुभव आणि त्या अनुभवाआतला काळ स्वतःत रिचवत आहात. तुमचा स्वतःचाही एक काळ होता. आतला आणि भोवतालचा. त्या दोन्हीतले नाते तपासत, त्यातली स्थित्यंतरे अनुभवत तुम्ही त्यांचा ताळेबंद मांडत राहिलात. म्हणूनच जेव्हा तुम्ही ‘माझा काळ’ हाच विषय घेऊन दीर्घ लेखन करायचे ठरवले, तेव्हा तुमच्या पिढीचा सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय संक्रमणाच्या उलथापालथीचा काळ दस्तावेज म्हणून आमच्या हाती लागणार याची खात्री झाली. पण..तुम्ही जिला ‘नियती’ म्हणता तिने मधेच तुम्हांला गाठले आणि तुमचा ‘काळ’ थांबला. तरीही तुम्ही आपल्या ‘आरंभकाळा’ विषयी जे लिहिले आहे त्यातून तुमचे आमच्या काळातले ‘असणे’ किती मोलाचे होते याचा प्रत्यय तुमच्या ‘नसण्या’नंतर अधिकच प्रखरपणे येतो आहे... तुमचा, जयंत पवार