Description
प्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाड्.मयाची, तशीच ‘मनोरंजना’चीही मोठी हानी झाली आहे. ‘मनोरंजना’च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत. ‘मनोरंजना’वर त्यांचे फार प्रेम होते, व प. वा. काशीनाथपंत मित्र यांच्या निधनानंतर पाठविलेल्या सहानुभूतीच्या पत्रात त्यांनी ‘मनोरंजन’ संस्था नेटाने चालविण्याविषयी कळकळीचे प्रोत्साहन देऊन, या कामी शक्य ती मदत करण्यास आपण तयार आहो, असे अभिवचन दिले होते. ‘मनोरंजना’त त्यांचे लहान-मोठे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘सारेच विलक्षण’ ही कादंबरी त्यांनी ‘मनोरंजना’करिताच लिहावयास घेतली होती. वाचकांस त्या कादंबरीने चटका लावला होता. ती संपूर्ण झाली असती, तर मराठीत एका उत्तम कादंबरीची भर पडली असती. फर्ग्युसन कॉलेजच्या मंडळीने त्यांचे स्मारक करण्याचे योजिले आहे. त्यांच्या योजनेस लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होवो, असे आम्ही इच्छितो. पटवर्धनांच्या सर्व लहान-मोठ्या लेखांचा व कवितांचा संग्रह त्यांच्या विस्तृत चरित्रासह प्रसिद्ध झाल्यास, महाराष्ट्र ग्रंथभांडारातील ते एक बहुमोल रत्न होईल. वासुदेवरावांचा साधा, प्रेमळ व विनोदी स्वभाव, त्यांच्याशी ज्यांचा ज्यांचा परिचय झाला, त्यांच्या आठवणीतून कधी जाणार नाही. नेहमी विनोदपूर्ण भाषणाची त-हा, हसतमुख चेहरा, व जग हे एक ‘प्रचंड काव्य’ आहे, म्हणूनच ते आनंदाचे वसतिस्थान होय, ही दृढ भावना त्यांच्या मनात बाणल्यामुळे त्यांच्या विनोदी स्वभावात कधीही बदल झाला नाही. आपल्या कर्तव्यात कधी त्यांनी खंडही पडू दिला नाही. अर्थातच सुख काय किंवा दु:ख काय, त्यांच्या बाबतीत समान ठरून गेले होते. अशा त-हेने पवित्र कर्तव्य बजावीत असता त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या वियोगाने महाराष्ट्रातील एक उत्तम टीकाकार नाहीसा झाला. त्यांच्या मृत्यूने डे.ए.सोसायटीची अपरिमित हानी झाली आहे. एवढेच नव्हे तर, सर्व महाराष्ट्राची हानी झाली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. त्यांच्या संगतीत विद्यानंदाचा थोडाबहुत अनुभव जो काही माझ्या वाट्याला आला, त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक व मन:पूर्वक त्यांच्या जीवात्म्यास हे स्मृतिलेखरूप पुष्प अर्पण करतो. (‘मासिक मनोरंजन (इ.स.१८९५-१९३५) या तत्कालीन अग्रगण्य मासिकात वासुदेव बळवंत पटवर्धन यांना संपादकांनी वाहिलेली श्रद्धांजली)