Description
'सरदार कुलवंतसिंग कोहली. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक - किती किती नावं सांगायची? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे - सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन - झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे! '