Description
“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते. जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती. काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोबर भुईसपाट झाला होता. मनाला आलेला विफलपणा, पुढच्या आयुष्यातला एकटेपणा हे सगळं तिला सहन होणार होतं का? इतकी वर्षं ती शिणली, कष्टली… हाती काय काय राहिलं होतं? सागराचं पाणी ओंजळीतून गळून जावं तशी सर्व नाती गळून गेली होती. शेवटी शेवटी ती एकटी, ती एकटीच राहिली होती. निष्काम कर्म- उच्चारायला शब्द फार सोपे; पण आचरणात महाकठीण.
वेळेचं चक्र घरंगळत चाललंच होतं. आयुष्यातून कोणालाच सुटका नव्हती. मनासारखं होत असलं म्हणजे दिवसांची यादच राहत नाही. आणि असं काही विपरीत घडलं की, क्षणाक्षणाचा बोजा असह्य होतो. एकटीचे हात तर अति दुर्बल होतात. एकेका क्षणाचं हे वजन, मग सेकंदाचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष… ती अजस्र रास पाहूनच जीव दडपून जातो. असं वाटतं या रात्रीखाली शरीर पिंजून जाणार आहे… त्याचा चेंदामेंदा होऊन जाणार आहे.”