Description
“बारा वर्षांपूर्वी कोलंबियाच्या रस्त्यावर पळवून नेलेली, बलात्कारित आणि गुलामाचं जगणं जगणारी एक बालमाता भेटली.
तिने मला विचारलं-
“मी कधीच स्वप्नं बघितली नाहीत, माझ्या मुलाला ती बघता येतील?”
प्रत्येक मुलाला ‘मूल’ व्हायचं स्वातंत्र्य मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. त्याला ‘मूल’ होण्याची मुभा असावी.
सर्वसामान्य आयुष्य जगण्याची आणि मोठं होण्याची… भुकेला अन्न मिळण्याची, पुरेशी झोप घेण्याची आणि कोंदट जागेतून बाहेर पडून लख्ख सूर्यप्रकाश बघण्याची… खेळण्याची आणि शिकण्याची… शाळेत जाण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न बघण्याची मुभा असावी.”
– नोबेल पुरस्कारप्रसंगीच्या सत्यार्थींच्या भाषणातून
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण विविध यंत्रांच्या हातातील कठपुतळी बनत चाललो आहोत. आपल्यातील माणुसकीची भावना कमी होत चालली आहे.
प्रत्येक गोष्टीत आपण आपला फायदा-तोटा पाहत आहोत.
या यांत्रिक जगाने आपल्यात इतका शिरकाव केला आहे की, आपण स्वत:च एक यंत्र बनत चाललो आहोत.
संवेदना, करुणा आणि आपलेपणा हे गुण मानवाला यंत्रापेक्षा वेगळे ठरवतात.
दुसर्यांचे दु:ख समजून घेणे, परोपकार, सहकार्य, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे ही मानवतेची मूल्यं जोपासणे काळाची गरज आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने कैलाश सत्यार्थींच्या जीवनातील सर्वसामान्यांना परिचित नसणार्या प्रेरणादायी घटना संकलित केल्या आहेत. या पुस्तक निर्मितीमागचा उद्देश म्हणजे खर्या अर्थाने समाजात माणुसकीची भावना जपणारे भविष्यातील कित्येक ‘कैलाश सत्यार्थी’ तयार व्हावेत हा होय. कैलाश सत्यार्थींसोबत जवळून कार्यरत असलेले लेखक शिवकुमार शर्मा यांनी वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचकांना मानवी मूल्यांची जाण देऊन करुणामयी बनण्यास मार्गदर्शक ठरेल.