Description
मानव स्वत:च्या उत्क्रांतीचा कधी विचार तरी करतो का?
आपण कोण होतो, कोठून आलो, कोठे चाललो आहोत, या प्रवासाची परिणती कशात होणार आहे याचा माणूस कधी विचार तरी करतो का?
मी तरी कोण? येथे या शहरात कसा आलो? प्रत्यक्ष मी नाही; पण माझे पूर्वज… कोठून आले? महत्त्वाकांक्षेने आले की, गरजेपोटी आले?
मी अनेक कुलवृत्तांत वाचले होते. चारचार, पाचपाच पिढ्यांचा इतिहास. त्यात एका तक्त्याच्या रूपात मांडला होता. आडव्या उभ्या रेषांनी जोडलेली ती फक्त नावं होत. अमक्याची ती चार-पाच मुलं… त्यांचे विवाह… त्यांची मुलं… हा नावांचा आणि रेषांचा तक्ता त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काय सांगणार? त्या तर फराट्यांनी ओढलेल्या रेषाकृती होत्या; पण माझ्या विलक्षण अनुभवात या रेषाकृती सजीव झाल्या होत्या. रंग… रूप… सुखं… दु:ख… अशा सगुण त्रिमित स्वरूपात समोर आल्या होत्या… रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत हा असाधारण अनुभव बसवणं किती कठीण होतं! जवळजवळ अशक्यच!
पण इथे धोका होता. त्या कालगर्तेत माझा प्रवेश अगदी सहज होत होता. पण काही कारणाने, अपघाताने, दुर्दैवाने मला परत माझ्या एकवीसाव्या शतकात परत येता आलं नाही तर? मी कालवस्त्राच्या त्या सुरकुतीत अडकून पडलो तर? सर्व शक्यतांचा विचार करायला हवा…