Description
प्रसिध्द इतिहासकार अॅर्नाल्ड टॉयनबी म्हणतो, की हिंदू (भारतीय) संस्कृती ही आजच्या जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. भारतीय उपखंडाएवढया मोठया प्रदेशात, अडीच हजार वर्षांपूर्वी ती पसरली होती. अशी गोष्टही जगाच्या इतिहासात प्रथमच घडली. नद्यांची सुपीक खोरी, मोठी लोकसंख्या आणि साधनसामुग्री असलेला हा भूप्रदेश आणि शौर्याचा, ज्ञानाचा वारसा असलेली संस्कृती हे, हेवा वाटावा असे 'देणे' आपल्याला लाभले. इतिहासाकडे मागे वळून पाहताना जे दिसते ते असे : चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी २४०० वर्षांपूर्वी ग्रीक आक्रमण परतवून या उपखंडात सीमा सुरक्षित असलेले एक सुनियंत्रित साम्राज्य निर्माण केले. टॉयनबी याला भारतातील पहिली 'युनिव्हर्सल स्टेट' असे म्हणतो. त्यानंतर जी राजकीय, धार्मिक आक्रमणे झाली त्याला विरोध झाला तरी असे पूर्ण यश पुन: हाती लागले नाही. भारतात मोगल साम्राज्य स्थापणारा बाबर अवघ्या पंधरा हजार सैन्यानिशी आला होता. रजपुतान्याकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती निश्चित होती. इंग्रज मूठभर होते. त्यांनी मराठयांना पराभूत करून दीडशे वर्षे राज्य केले. रजपूत, जाट, विजयनगर, मराठे, शीख एकएकटे लढले आणि पराभूत झाले. अशा शक्ती योग्य वेळी एकत्र आल्या असत्या, तर भारताचा इतिहास वेगळा घडला असता. हिंदू समाजातील ज्या त्रुटींमुळे पूर्वेतिहास असा घडला, तेच दोष आजही आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत का? हिंदू समाजाला परिवर्तनाची गरज आहे का? आणि त्या परिवर्तनाची दिशा कोणती, असे हे अस्वस्थ करणारे प्रश्न. या अस्वस्थतेचा प्रत्यय वाचकांपर्यंत पोहचावा ही 'एक अस्वस्थ हिंदू मन' या लेखनामागची भूमिका.