Description
श्रीकृष्णा महाराजांच्या अभंग वाचनाच्या समवेत ‘योगी’चे कादंबरी रूप येथे जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. समीक्षात्मक लेख असोत, पत्रात्मक संवाद घडो किंवा लिखित छोटेखानी वाचक प्रतिसाद असोत, सारेच नव्या आकलनासाठी आपल्याला सिद्ध करतात. विशिष्ट साहित्यकृतीचा विविधांगी वेध कसा घेतला जाऊ शकतो? विशिष्ट काळात एखाद्या साहित्यकृतीची काय चर्चा होते? वाचकांकडून कशी स्वीकृती झाली आहे, त्यासंबंधीचा दस्तऐवज म्हणून या सार्या संकलनाकडे, संपादनाकडे पाहावे लागेल.
भक्त ते साधक आणि अंतिमत: समाधिस्थ. हा प्रवास श्रीकृष्णा महाराजांच्या अभंगांमधून दिसतो, ‘योगी’ या कादंबरीतूनही दिसतो, हा प्रवास प्रतिभासिक प्रचितीचाही आहे. ‘योगी’ हा अनुबंध भक्तियोगाशी साधलेला आहे. शिवाय हा भक्तियोग कर्मयोगासाठी खुणावत आहे, अभंगांतील लोकशिक्षणाचा-नीतिशिक्षणाचा आशय कर्मयोगाचे संसूत्रन करतो. श्रीकृष्णा महाराजांचे जीवन मात्र विरक्ती आणि पुढे मुक्ती, ही मुक्तीही अद्वैताच्या पायावरच समाधिस्थ, ही मुक्तीसमाधी, अद्वैताशी! ‘आपपर भाव नाही चैतन्या जैसा’ हा ज्ञानदेवीय दृष्टांत येथे सहज स्मरतो आहे. ‘प्रेम समतेचा पिकवी मळा’ ही कृष्णा महाराजांची शिकवण आहे.