Description
लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असल्याने ‘मापापेक्षा’ जास्तच देणारे आहे. दीडेकशे पानांचा मजकूर ‘बन चुक्या’ लेखकाने सहाशे पाने ताणला असता! पण हे क्षम्यच मानायला हवे. एक म्हणजे लेखक वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या संकल्पना कोणत्या परिस्थितून उपजल्या ते सांगायला मानवाचा इतिहासही रेखतो. त्यातली सर्व माहिती, सर्व मते तपासून, आधार देऊनच मांडतो. कुठेही ‘बाबावाक्य’ नाही, की दिखाऊ विद्वत्ता नाही. आपल्याला कोणते मत पटते व ते का पटते, हे सतत स्पष्ट केलेले आहे. उपहासासारखे पोरकट हत्यार कुठेही वापरलेले नाही. हा विवेकीपणा, हे शहाणपण, दुर्मिळ आहे.
- नंदा खरे (लेखक - कहाणी मानवप्राण्याची, वारूळ पुराण,
या पुस्तकात लेखकाने व्यापाराच्या उगमापासून ते आधुनिक अर्थव्यवस्थेपर्यंतचा मानवी प्रवास अत्यंत सोप्या भाषेत दिला आहे. अर्थशास्त्राच्या बदलत्या विचारधारा आणि मुख्य सिद्धांत लेखक साध्या भाषेत मांडतात. दैनंदिन अर्थव्यवस्थेतील उदाहरणांची जोड देऊन, समाज आणि पर्यावरण यांच्यावर अनपेक्षित परिणाम कसे होत गेले, हे सहज समजावून दिले आहे. सर्व जगाने स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेच्या आधारे आपल्याला शाश्वत विकासाच्या मार्गावर जाता येईल का, असा प्रश्न वाचकाच्या मनात उभा राहतो. पुढे पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी यावर काय उपाय सुचविले आहेत यावर विवेचन आहे. आज जगातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या माध्यमातून शाश्वत विकासाची वाटचाल कशी होत आहे याचा उलगडा होतो आणि वाचकाला शाश्वत विकासात आपले स्वतःचे योगदान काय असायला हवे याची ओळख होते.
• राजेंद्र शेंडे (निवृत्त डायरेक्टर युनायटेड नेशन्स एनव्हायरनमेंट प्रोग्राम,
ओझोन अॅक्शन प्रोग्रामचे मुख्य, चेरमन तेरपोलिसी सेंटर)

