Description
मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रामाणिकपणे तरुण- तरुणींच्या जगण्याचे भावविश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या अक्राळविक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकीनऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही, ते आत्महत्येसारखा पर्याय जवळचा करतात; पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते. स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्या उभ्या राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून ते परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावे, तर समाज मान्यता देत नाही; लग्न होत नाही म्हणून त्यांच्यावर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरू होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचे खच्चीकरण होते; काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमके काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.