Description
श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा.
पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥
असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें.
श्री. भा. द. खेर व श्री. वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं.
आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें.
श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार.
– ग. दि. माडगूळकर
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले.
गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.
आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!