Description
‘थांब श्रमणा, थांब.’
त्याचे हे शब्द कानी पडताच तथागत म्हणाले, ‘मी तर थांबलो आहे अंगुलिमाल; पण आता तूदेखील थांब. हे दुष्कर्म करण्याचं आता तरी थांबव.’
अंगुलिमाल आश्चर्यानं तथागतांकडे बघू लागला. त्याला काहीच समजेनासं झालं. तथागतांना पाहून तो भारावून गेला.
तेव्हा तथागत त्याला म्हणाले, ‘बरं! असं कर, मला त्या झाडाचं एक पान तोडून दे.’
अंगुलिमालनं पटकन एक पान तोडून तथागतांना दिलं.
‘आता हे पान परत त्या झाडावर लाव,’ तथागतांनी अंगुलिमालला सांगितलं.
‘काय?’ अंगुलिमाल आश्चर्यानं म्हणाला.
तथागत शांतपणे म्हणाले, ‘होय. आता हे पान परत त्या झाडावर लाव.’
‘हे कसं शक्य आहे भन्ते. हे असं करणं शक्य तरी आहे का? झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं?’ अंगुलिमाल म्हणाला.
‘तू हे पान पुन्हा जोडू शकत नाहीस तर मग ते तोडलंसच का? याचाच अर्थ असा आहे अंगुलिमाल की, जर तू कुणाला जीवन देऊ शकत नसशील तर मग तुला इतरांचं जीवन हिरावून घेण्याचाही काही अधिकार नाही. तेव्हा सन्मार्गावर ये अंगुलिमाल,’ त्याला समजावत तथागत म्हणाले.
तथागतांचे हे शब्द ऐकून अंगुलिमालच्या अंतरात्म्यातील अहिंसक जागा झाला आणि अंगुलिमाल त्यांच्या चरणी लीन झाला.”
– प्रस्तुत पुस्तकातून
बौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील, करुणा, नैतिकता, सदाचार आणि सद्गुण आदी तत्त्वांची शिकवण देणारे हे पुस्तक सर्वांना आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.