Description
माडगूळकरांच्याजवळ स्पृहणीय रचनापाटव आहे. गीतातील भावनामक आशयाला फारसा धक्का न लावता आणि शब्दसौष्ठवाला बळी न देता ते एक परिपूर्ण गीत रचू शकतात. ‘चैत्रबना’तील पदे त्यांतील नेमक्या व मोजक्या प्रतिमांनी हृदयास अचूक भिडतात. ही प्रतिमासृष्टी पारंपरिक असली, तरी माडगूळकरांच्या प्रतिभेने त्यांना चित्ताकर्षक मखर करून दिले आहे. संतांच्या आणि शाहिरांच्या प्रतीकांना नि प्रतिमांना ‘चैत्रबना’ने विशेष आवडीने अंगावर मिरवले आहे. त्यांच्या चपखल प्रतिमा अनेकदा डोळ्यांना दिसतात, कानांशी वाजतात. नाकांशी गंध उधळतात. इंद्रियसंवेदनांना त्या प्रतिमा जागवतात आणि त्यांवर भावनांची ठळक मुद्रा रेखतात. शब्दांची निवड, त्यांची गोठवण, अचूक अलंकाररचनेचे चिरेबंद शिल्प, आशयाची पातळी या सर्व बाबतींत माडगूळकरांची पदे जो संस्कार मनावर करतात त्याचे वर्णन मी ‘अभिजात’ या संज्ञेनेच करीन. माडगूळकरांना लावण्या फार चांगल्या जमतात व भक्तिपर गीते लिहिताना ते ‘संत’च बनतात. गंमत अशी की, या दुहेरी किमयेने ते मराठी काव्यपरंपरेच्या आत्मीय गुणांनाच हात घालतात, आपले पुराणे संस्कार जागवतात, चाळवतात. ‘चैत्रबना’त म्हणून वाचक हरखतो आणि दूरच्या प्रवासाला जाऊन परतण्यास नाखूश असतो.