Description
“या कवितेत ‘आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा’ निरर्थक न ठरो, झाडातून डोकावणारे ‘रोशन सूर्य’ न ढळोत, ‘विनाशतत्वाच्या झपाट्यात’ जमिनीतली ‘उग्रगंधी धूळ’ दरवळो आणि जगण्याची समृद्ध अडगळ’ घरभर साचून राहो असे पसायदान या कवितेत मागितले आहे. या सर्व सचेतन प्रतिमांमधून जीवनदायी प्रेरणांचा स्त्रोत ओसंडून वाहताना दिसतो. महानगरी कवितेतील मरणाधीन वृत्तीला शह देणारी ही वृत्ती आहे. पण मरणाच्या डोळस जाणिवेमुळे या कवितेतील जीवननिष्ठा फोल न ठरता तिला बळकटीच येते. चांगल्या जगण्याला नेहमीच असा मरणाचा अंकुश असतो. म्हणून मरणाच्या जाणिवेतून सूचित होणारे विनशतत्त्व दृष्टिआड करून नेमाड्यांची कविता भाबड्या आशावादाकडे झुकत नाही. तसेच महानगरी कवितेप्रमाणे मरणाच्या सार्वभौमत्वाचा तटस्थ स्वीकार न करता या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचे भक्कम संदर्भ ती उभे करते. या विनाशातत्त्वाला शह देणारी जगण्याची उभारी आणि त्यातून अटळपणे येणारी लढाऊ वृत्ती हा स्थायीभाव असलेल्या नेमाड्यांच्या उमद्या जीवनदृष्टीचे दर्शन त्यांचा कवितेतही होते.