Description
विसाव्या शतकाने दोन महायुद्धं, महामंदी, दुष्काळ, भूकबळी यांचा भीषण अनुभव घेतला. आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. 'केवळ स्वतःसाठीच व स्वतःपुरतेच जगणे, हे प्राणीपातळीवरचे आहे.' असा समज दृढ असणाऱ्या त्या काळात जात, धर्म, वर्ग व लिंग हे भेदाभेद अमंगळ मानणारे अनेकजण होते. सर्व प्रकारची कुरूपता नष्ट करण्याचं ध्येय घेऊन, सर्व भेदांच्या पलिकडे जाणारा सुसंस्कृत व विवेकी समाज घडवण्याची उमेद असणारे, ते वातावरण होते. त्या काळात 'वो सुबह कभी तो आएगी' ही आशा त्यामुळेच होती. कित्येक शिक्षक, साहित्यिक, कलावंत, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर हे भवताल बदलण्याकरिता झटत होते. ह्या व्यक्तींच्या प्रभावामुळे खेड्यापासून जागतिक पातळीपर्यंत अनेक संस्था निघाल्या आणि त्यांच्या सभोवतीचे क्षेत्र उजळून निघाले.
आता मात्र विचारांचा लंबक 'मी आणि मीच' ह्या टोकाला जाऊन बसला आहे. विसंवाद सुद्धा न होणारी असंवादी अवस्था दिसत आहे. नाती तुटत चालली आहेत. संवेदनशीलता दुर्लभ झाली आहे. पावलोपावली मूल्य ऱ्हासाच्या खुणा दिसत आहेत. व्यक्ती आणि नाती यांच्या वस्तुकरणाचा काळ अनुभवास येत आहे. असाच विचार पूर्वसुरींनी केला असता तर आपले जीवन सुकर झाले नसते. या निमित्ताने 'आपणच आपणास पुन:पुन्हा पाहावे', एवढेच !

