Description
१९९१ च्या आखाती युद्धात अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केल्यावर, सद्दामने त्याचा बदला घेण्याचा बेत केला. सद्दामने वापरलेले सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे माणसाची हाव. अमेरिकेतल्या नामांकित गुन्हेगारांना हाताशी धरून, सद्दामने अमेरिकेचा मानबिंदू असणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हस्तगत करण्याचा धाडसी बेत आखला आहे. त्यासाठी त्याने शंभर मिलियन डॉलर्सचे आमिष गळाला लावले आहे. जाहीरनाम्याची मूळ प्रत ताब्यात घेऊन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी जगभरातील वार्ताहर बोलावून त्यांच्यासमोर त्याचे जाहीर दहन करायची सद्दामची योजना आहे. सद्दामच्या या कारस्थानात अडथळा आहेत दोन व्यक्ती. स्कॉट ब्रॅडली, एकीकडे येल विश्वविद्यालयातील घटनात्मक कायद्याचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला सीआयएचा उगवता तारा, जो कधीचाच प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी आहे हान्ना कोपेक, मोस्साद या इस्रायली गुप्तहेर संस्थेची देखणी हस्तक; १९९१ च्या युद्धात तिने तिचे अख्खे कुटुंब गमावलेले आहे. सद्दामचा सूड हे आता तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. शह-काटशह, कट-कारस्थाने आणि वळणावळणांनी भरलेली ही वेगवान कथा वाचकांना खिळवून ठेवते.