Description
तामीळ भाषेत नीतिशास्त्रावर पुष्कळ ग्रंथ आहेत, त्यातील पुष्कळसे प्राचीन आहेत. अशा ग्रंथांपैकीच प्रस्तुतचा “१०८० श्रेष्ठ सुविचारांचा संग्रह” हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना काव्य स्वरूपात आहे. हे एक उत्कृष्ट काव्य आहे; परंतु काव्यापेक्षाही त्यातील विचार उदात्त नि गंभीर आहेत. वाणीची श्रीमंती नि अर्थाची श्रीमंती- दोन्ही येथे अनुभवावयास मिळतात.
“१०८० श्रेष्ठ सुविचारांचा संग्रह” या अलौकिक ग्रंथाचा तिरुवल्लुवर हा कर्ता. पांड्य राजाच्या मदुरा या राजधानीतील हा संतकवी असून प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने त्याने जगाला बहुमोल देणगी दिली आहे. तामीळ भाषेत या ग्रंथाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून याचा ‘तामीळ वेद’ असा यथार्थपणे उल्लेख केला जातो.
हे पुस्तक म्हणजे सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अभिनव विचार यांचा संग्रहच.
लॅटिन, फ्रेंच, जर्मन आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधून या ग्रंथाचे भाषांतर झाले आहे. साने गुरुजींनी हा ग्रंथ मराठीत आणून मराठी वाचकांना यातील मौल्यवान विचारांची देण बहाल केली आहे. “१०८० श्रेष्ठ सुविचारांचा संग्रह” ग्रंथात बुद्ध, खिस्त यांच्या उपदेशांसारखे सुंदर उपदेश आहेत; चाणक्य, महाभारत यांच्या शिकवणीसारखे थोर अर्थशास्त्र येथे आहे; तर कालिदासासारख्या वागीश्वरांच्या तोलाचे प्रेमभाव व्यक्त करण्याचे सामर्थ्यही येथे आहे.
हे सुविचार केवळ आध्यात्मिकतेच्या वाटेवर नेणारे किंवा आधिभौतिक तत्त्वज्ञान सांगणारे नाहीत, तर लौकिक जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे आहेत. सच्छील, निर्भय जीवन जगायचे असेल तर हे महान विचार नक्कीच सहायक ठरतील.