Description
लोकमान्य टिळक यांचा १८९८ ते १९०८ हा राजकीय कर्तृत्वाचा माध्यान्हकाळ मानला, तर ते याच काळात ‘भारतीय असंतोषाचे जनक’ बनले. वास्तविक कोणा एका व्हॅलेंटाइन चिरोल नामक ब्रिटिश पत्रकाराने त्यांना हे बिरूद जरी दूषण देण्यासाठी चिकटवले, तरी ते त्यांचे भूषण ठरले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय जीवनाची चतु:सूत्री त्यांनी सांगितली. त्याचवेळी त्यांनी ब्रिटिशांना ‘राजकारण करणे म्हणजे राजकारस्थान करणे नव्हे!’ असे बजावले. अखिल भारताचे ते नेते झाले ते याच काळात. १९०८ची राजद्रोहाची शिक्षा त्यांनी असामान्य धैर्याने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. याचवेळी त्यांची कीर्ती त्रिखंडात दुमदुमली आणि मानवी इतिहासात ते एक महापुरुष म्हणून मानले गेले. आधी ते नामदार टिळक होते, ते ‘लोकमान्य’ झाले. याच त्यांच्या लोकमान्यत्वाच्या पैलूंविषयी सांगत आहेत लोकमान्यांचे अभ्यासक अरविंद व्यं. गोखले.