Description
विश्र्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल? विश्र्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्र्वाचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्र्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे. महास्फोटातून आपलं हे अफाट विश्र्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्र्व हे विज्ञानाला उमगलं. विश्र्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्र्व सपाट आहे की वक्र? ते बंद आहे की खुलं? बिंदुवत् स्थितीनं विश्र्वाचा अंत होईल? की निरंतर विस्तारणारं विश्र्व विरून जाईल? विश्र्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्र्वाचा उपक्रम आहे? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्र्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं? अजून काय काय समजायचं बाकी आहे? खरं म्हणजे विश्र्वाचं कोडं मानवाला उलगडेल? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा.