Description
भारताचे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून तमाम भारतीयांसमोर आदर्श निर्माण करणारे मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपले प्रेरणास्थान. आपल्या उत्तुंग कार्याद्वारे त्यांनी भारताला सामर्थ्य देण्यासोबतच जगाच्या इतिहासात वेगळी उंची मिळवून दिली. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी भारताला स्वयंपूर्ण बनविले. बलशाली आणि प्रगत भारत हे त्यांचे स्वप्न होते.
जिद्द, चिकाटी आणि अविरत कष्टांच्या बळावर त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखविले. आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून त्यांनी अवघे आयुष्य निरपेक्षपणे देशसेवेला वाहिले. नितळ, निष्कपट कलामांची देशातील लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ख्याती होती.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका कलामांनी अतिशय समर्पित वृत्तीने पार पाडली. राष्ट्रपती भवनात सर्वोच्चपदी असतानादेखील सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावाने त्यांनी आपुलकीचे वातावरण निर्माण केले. शिक्षक म्हणून आपली ओळख असण्याचा तर त्यांना सार्थ अभिमान होता.
प्रत्येकाबरोबर आत्यंतिक सौजन्याने वागण्याची वृत्ती, अध्यात्मावर असलेला प्रगाढ विश्वास, विचारमूल्यांवर असलेली निष्ठा, ज्ञानार्जनाशी एकरूपता अशा कितीतरी बहुविध पैलूंमुळे त्यांचा जगाच्या इतिहासावर चिरंतन ठसा उमटला आहे.
रामेश्वरमसारख्या लहानशा तीर्थक्षेत्री सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कलामांनी हे सर्व साध्य केलं तरी कसं? स्वत:च्या स्वार्थाचा तसूभरही विचार न करता अहोरात्र काम करत राहण्यासाठी त्यांची मनोभूमिका कशी तयार होत गेली? यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या आयुष्याचे प्रेरणादायी चित्रण करणारे हे वेधक चरित्र