Description
...भिंतीवर बसवलेला मोठा कर्णा आणि ते विचित्र यंत्र तिनं पाहिलं. तिला गंमत वाटली. ``मी याच्यात गायचं, गैसबर्ग?'' तिनं विचारलं. ``होय, बाईसाहेब.'' गैसबर्ग उत्तरला. ध्वनिमुद्रणाची तयारी करण्यात तो गुंतला होता. सगळी यंत्रसामग्री आपापल्या जागी बसल्यानंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, ``आम्ही तयार आहोत, तुम्ही?'' ती हसली, तिनं होकारार्थी मान हलवली आणि कर्ण्यापाशी गेली. तिचा तो जादूभरा, वरच्या पट्टीचा अन् मधुर आवाज कर्ण्यात घुमताच भारतीय शास्त्रोक्त संगीतानं फारच मोठी मजल मारली होती. तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून हे संगीत सामान्यांच्या घराघरात पोचलं होतं. गौहर जान भारताची पहिली ग्रामोफोन गायिका ठरली होती!