Description
विशिष्ट काळातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणाला कवेत घेणारी ‘कोवळे वर्तमान’ ही कादंबरी केवळ ‘कामाजी कार्लेकर’ या एका व्यक्तीची गोष्ट नाही. तिच्यातून उमटणारे समूहस्वर समष्टीच्या अंतरंगाची उकल करतात. किंबहुना म्हणूनच अर्जित केलेल्या ज्ञानपरंपरेतून जगण्याचा गवसलेला अर्थ व्यापक पटावरून मांडण्याचा हा धाडसी बाणा तुकोबांच्या दंभावर प्रहार करणाऱ्या फटकळ वृत्तीशी अनुबंध प्रस्थापित करतो. जातवास्तवाचे अंत:स्तर व प्रसंगी उफाळून येणाऱ्या त्यातील असंख्य चिवट गोष्टींची उकल समाजशास्त्रीय दृष्टीने करण्याची प्रभावी क्षमता श्रीकांत देशमुख यांच्या या कादंबरीतून प्रकटते. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कुळातील शिकणाऱ्या नव्या पिढीच्या नजरेतून ढासळत गेलेल्या शिक्षणक्षेत्राचे आणि तिथून प्रसवणाऱ्या नकली व बेगडी विचारांचे दयनीय चित्र कथानकातील चर्चा – संवादातून आकार घेत जाते. समाजनिरीक्षणाचे बारकावे टिपत उपरोध, तिरकसपणा, मिस्कीलपणा यांच्यासह कथानकाचा विस्तार करणारी कथनशैली ही श्रीकांत देशमुख यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये.
श्री. व्यं. केतकर ते भालचंद्र नेमाडे या दोन अक्षांमधील समाजशास्त्रीय चिकित्सेच्या पटाशी नाते जोडणारी ही कादंबरी एक प्रभावी चिंतनशील संभाषित आहे. भिन्न विचारांचे आणि भिन्न विचारसरणींचे उभे-आडवे ताण समाजातील हरवलेल्या चेहऱ्यांच्या नाना व्यक्तींच्या बोलण्यातून सलगपणे उमटत जातात. परिणामी या कादंबरीची रचना एका दीर्घ स्वगतासारखी होत जाते. निरंतर चिंतनाच्या परिपाकातून या स्वगताला स्वत:चा आणि समूहचिंतनाचाही आकृतिबंध सापडलेला दिसतो.
सतीश बडवे.