Description
मुसाफिर पुस्तकामुळे अनेक लोकांची आयुष्य बदलली. कित्येक जण आपल्या आयुष्याला आलेली मरगळ झटकून पुन्हा उभे राहिले. हजारो लोकांचं यामुळे नैराश्य गेलं आणि कित्येक लोकांना या पुस्तकामुळे आत्महत्येपासून परावृत्त केलं, असं अनेक वाचक सतत सांगत असतात. अनेकांना हे पुस्तक वाचून गाण्याची आवड निर्माण झाली तर काहींना साहित्याची. काही जणांनी आयटीमध्ये करिअर करायचं ठरवलं तर काही जणांनी सामाजिक काम करायचं ठरवलं. एकूण मुसाफिर हे एक फक्त पुस्तक न राहता ते एक सुंदर सोबती म्हणून हजारो लोकांच्या हृदयात जाऊन बसलं. उदासीन वाटायला लागलं की मुसाफिर मधलं कुठलंही पान काढावं आणि पुढची वीस-तीस पानं वाचावीत की पुन्हा तरतरी येते असं असंख्य लोक सांगतात. याचं कारण या पुस्तकात आपल्याला सहा दशकांचा इतिहास वाचायला मिळेल- सोलापूर, आयआयटी, आदिवासी चळवळ, तुरुंगवास, झोपडपट्टी आणि वेश्यावस्तीत राहणं, त्यानंतर आयटीत प्रवेश आणि तिथला संघर्ष, मुलाच्या ऑटिझममुळे आलेला प्रचंड आघात, त्यातून सावरून २३ वर्ष आयटीमध्ये सर्वोच्च पदी राहून हजारो सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कंपन्या चालवणं, मग वर्षाला तीन कोटी रुपयांच्या ऑफर्स सोडून मराठीमध्ये लिखाण सुरू करणं, ५० बेस्ट सेलर पुस्तकं लिहिणं आणि त्यातून वाचकांचे उदंड प्रेम अनुभवायला मिळणं हा सगळा प्रवास लोकांना खूपच प्रेरणादायी वाटणारा आहे.