Description
'या कवीचा भर आदिम काळापासून आजवर चालत आलेल्या ओझोनच्या सावलीतील मानवी अस्तित्वशोधावर आहे. माणसामधील आदिम प्रेरणा व संस्कार, अस्तित्वाची अनाकलनीयता व निरर्थकता, मानवी संबंध अशा अनेक अंगांचा शोध ही कविता घेऊ पाहते. कवी वासुदेव यांच्या अस्तित्वशोधाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या शोधाला असलेला काळाचा संदर्भ होय. अमूर्त काळापासून ते वैज्ञानिक काळापर्यंतची काळाची वेगवेगळी रूपे ही कविता आविष्कृत करू पाहते. काही कवितांमध्ये काळाचे चेतनीकरणही केले जाते. काळाचे व काळाच्या संदर्भातील मानवी अस्तित्वाचे उत्कट चिंतन ही कविता व्यक्त करू पाहते. त्याप्रमाणेच जागतिकीकरणाच्या संदर्भातील समकालीन जगण्याचा, त्यातील अनेकविध प्रश्नांचा, अंतर्विरोधांचा शोध ही कविता घेऊ पाहते. या जीवनातील स्पर्धा, त्यातील रितेपणा, आधुनिक माणसाची अमर्याद भोगलालसा, त्याची प्रवाहपतितता या कवितेतून व्यक्त झाली आहे. प्रेम व निसर्ग हे अनुभवही या कवितेचे आस्थाविषय आहेत. येथे या अनुभवातील तरलता, धूसरता अनेकविध प्रतिमा-प्रतिकांच्या साहाय्याने, प्रामुख्याने रोमँटिक काव्यशैलीत आविष्कृत केली जाते. या काव्यशैलीत नव्या- जुन्या काव्यशैलींचे ताण अनेकदा दिसत असले, तरीही ही कविता कोणत्याही एका काव्यशैलीच्या आहारी मात्र जात नाही. डॉ. वसंत पाटणकर