Description
जैवविविधता हाच पृथ्वीतलावरील एक गूढ रंजक विषय आहे. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी ही सृष्टी संपन्न आहे.
लाखो जाती-प्रजातींचे प्राणी पृथ्वीतलावर सुखेनैव जगत असतात.
त्यांच्या जीवनशैलीच्या विविधतेस पृथ्वीचं बहुढंगी पर्यावरणही कारणीभूत आहे.
परिणामत: प्राण्यांच्या प्रजोत्पादन तऱ्हांतही अशीच विविधता आढळते.
पुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी लिंगभेदउत्क्रांती विकसित झाली, असा सर्वसाधारण सिद्धांत मांडला जातो. या सिद्धांतालाही काही वैज्ञानिकांचे आक्षेप आहेत.
कारण अविकसित प्राण्यांत असा लिंगभेद नाही, तरीही त्यांचं पुनरुत्पादन कार्य व्यवस्थित चालू आहे.
तसंच काही प्राण्यांमध्ये तर लिंगभेद असूनही अलैंगिक पद्धतीने पुनरुत्पादनाची क्रिया सुरू आहे.
मग प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी लिंगभेद आवश्यक आहे का? असल्यास नर आणि मादी यांचा समागमही आवश्यक असतो का?
पुनरुत्पादनासाठी अंडी, बीजांडं यांची तरी जरुरी आहे का? आणि यांपैकी कोणतीही व्यवस्था प्राण्यांत नसेल, तर ते प्राणी पुनरुत्पादनासाठी
सक्षम असतात का नाही? मग अशा विविध प्राण्यांच्या प्रजननासाठी निसर्गानं काय काय व्यवस्था रचल्या आहेत?
असे अनेक प्रश्न सामोरे येतात आणि त्यांचा अभ्यास करताना कित्येक रंजक गोष्टी उकलत जातात.
त्याचा वेध घेत निसर्गाच्या थोरवीचं विस्मयकारी दर्शन घडवणारं हे पुस्तक अबालवृद्धांसह सर्वांनी वाचावं असंच आहे.