Description
सेतु बांधियला सागरी छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे. या पुलानं उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण त्याचं दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे तो मध्यभागीचा रज्जुसेतू. 126 मीटर उंचीच्या मनो-यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत जाणा-या दोरखंडांनी हा 600 मीटर लांबीचा पूल तोलून धरला आहे. पुलाला उचलून धरणा-या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणा-याच्या मनात येते. ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही, अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे... कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं ! त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची ही सचित्र सुरस कथा.